Home वर्धा वर्धा जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्णपान; 69 वर्षांत पहिल्यांदाच 5 सुवर्णपदकांची कमाई

वर्धा जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्णपान; 69 वर्षांत पहिल्यांदाच 5 सुवर्णपदकांची कमाई

240

वर्धा :–

स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 69 वी आंतरशालेय राष्ट्रीय कराटे क्रीडा स्पर्धा 2025–26 बऱ्हाणपूर (बारामती, पुणे) येथील पोलीस सब-हेडक्वार्टर ग्राउंडवर यशस्वीरीत्या पार पडली. कराटे-डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष शिहान सल्लाउद्दीन अंसारी व महासचिव शिहान संदीप गाडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या स्पर्धेत वर्धा जिल्ह्याच्या खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल पाच सुवर्णपदके पटकावली.

मागील 69 वर्षांच्या कालावधीत वर्धा जिल्ह्याला एकही सुवर्णपदक मिळाले नव्हते. मात्र यावर्षी प्रथमच एक नव्हे तर पाच सुवर्णपदकांची कमाई करत वर्धा जिल्ह्याने इतिहास घडवला आहे. विशेष म्हणजे या कामगिरीमुळे वर्धा जिल्हा संपूर्ण भारतात सर्वाधिक सुवर्णपदके मिळवणारा जिल्हा ठरला आहे.

19 वर्षांखालील मुले गटात पियूष सिंग, तर 17 वर्षांखालील गटात नैतिक राऊत, मोहिनी चुटे, देवांशु लाखे व कैवल्य सागरकर यांनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत सुवर्णपदके मिळवली.

या ऐतिहासिक यशानंतर खेळाडूंच्या वर्धा आगमनानिमित्त मान्यताप्राप्त एकमेव कराटे संस्था कराटे-डो स्पोर्ट्स असोसिएशन वर्धा जिल्हा यांच्या वतीने मंगळवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता बजाज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान भव्य स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अधिकृत सत्कार सोहळा पार पडला.

या कार्यक्रमास तालुका क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे, सांजली वानखेडे, देवळीचे तालुका क्रीडा अधिकारी गणेश येलावार, क्रीडा अधिकारी जमील अकत्तर, क्रीडा शिक्षक योगिता तागडे, जवान कॅरिअर अकॅडमीचे संचालक प्रवीण पेठे, कराटे-डो स्पोर्ट्स असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे संरक्षक सेन्साई निलेश राऊत, अध्यक्ष सेन्साई काशिनाथ रघाटाटे, सचिव शिहान मंगेश भोंगाडे तसेच अनेक प्रशिक्षक व क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खेळाडूंनी या यशाचे श्रेय कराटे-डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, कराटे-डो स्पोर्ट्स असोसिएशन वर्धा जिल्हा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक तसेच आई-वडिलांना दिले. राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवेत 5 टक्के आरक्षण निश्चित झाल्याने जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पालकमंत्री आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार राजेश बकाने, जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. आशा मेश्राम यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.