Home वर्धा वर्धा वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे जखमी दुचाकीस्वाराचे प्राण वाचले

वर्धा वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे जखमी दुचाकीस्वाराचे प्राण वाचले

89
Oplus_131072

सेलू :–

वर्धा जिल्हा वाहतूक पोलिसांच्या सतर्कता व तात्काळ मदतीमुळे अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे प्राण वाचले. ही घटना मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास सेलू–सेवाग्राम मार्गावरील पवणार पुलावर घडली.

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलीस पथक मोटार वाहन कायद्यान्वये कारवाईसाठी पवणार परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, पवणार पुलावर एक दुचाकी स्लिप होऊन चालक रस्त्यावर पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती.

यावेळी पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस हवालदार किशोर पाटील व चालक स्वप्नील तंबाखे यांनी तत्काळ रस्त्यावर पडलेल्या जखमी इसमास सुरक्षित ठिकाणी हलवले. त्याचप्रमाणे त्याची दुचाकी (क्रमांक MH 27 BS 1502) देखील रस्त्याच्या कडेला लावण्यात आली. तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमी दुचाकीस्वार राजेंद्र कुबळे (वय ५०, रा. सुरगाव, जि. वर्धा) यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

वेळीच प्रथमोपचार व वैद्यकीय मदत मिळाल्याने जखमी व्यक्तीचा रक्तस्राव कमी झाला असून त्याचे प्राण वाचले. जखमी इसमाचे भाऊ विजय रंगराव कुबळे (रा. सुरगाव) यांना घटनास्थळी बोलावून जखमीची दुचाकी, मोबाईल व इतर साहित्य त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

वाहतूक पोलिसांनी केलेल्या तत्पर सहकार्याबद्दल जखमी व्यक्तीच्या भावाने वर्धा वाहतूक पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, दुचाकी चालविताना वेगावर नियंत्रण ठेवावे, हेल्मेटचा वापर अनिवार्यपणे करावा व अपघातमुक्त प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे.

— पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, वर्धा