Home महाराष्ट्र अंगारकी चतुर्थीनिमित्त केळझरमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी

अंगारकी चतुर्थीनिमित्त केळझरमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी

163

हजारो भाविकांनी घेतला श्री सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनाचा लाभ

सेलू :–

अंगारकी चतुर्थीनिमित्त केळझर येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. अभिषेक, सकाळची आरती तसेच मंदिर परिसरात सुरू असलेल्या भजन-कीर्तनामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. स्थानिक भाविकांसह बाहेरगावी वास्तव्यास असलेले केळझरचे ग्रामस्थही खास बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चतुर्थी निमित्त केळझर येथे दोन दिवसांची यात्रा (जत्रा) भरविण्यात आली असून, त्यामुळे भाविकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक नियंत्रण, दर्शन रांगा व गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते.

भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, सुलभ दर्शन व अन्य आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. समितीच्या सुयोग्य नियोजनामुळे दर्शन प्रक्रिया सुरळीत पार पडली.

यावेळी श्री सिद्धिविनायक मंदिर, केळझरचे अध्यक्ष माधव इरुतकर, सचिव सुभाष तेलरांधे तसेच संस्थेचे सदस्य यांनी भाविकांच्या सेवेसाठी विशेष परिश्रम घेतले. अंगारकी चतुर्थीच्या पावन पर्वावर केळझरमध्ये भक्ती, उत्साह आणि शिस्त यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

अंगारकी चतुर्थीचे धार्मिक महत्त्व

संकष्टी चतुर्थी दर महिन्याला येते; मात्र अंगारकी चतुर्थीचा योग वर्षातून फारच क्वचित वेळा येतो. संकष्टी चतुर्थीपेक्षा अंगारकी चतुर्थीला एकवीस पट अधिक महत्त्व असल्याचे शास्त्रात सांगितले आहे. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते.

पुराणकथेनुसार मंगळग्रह (अंगारक) याने हजारो वर्षे भगवान श्री गणेशांची कठोर तपश्चर्या केली होती. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन बाप्पांनी मंगळग्रहाला वरदान दिले की, मंगळवारी येणारी चतुर्थी अंगारकी म्हणून ओळखली जाईल. या दिवशी केलेल्या व्रताचे पुण्य वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थी व्रतांच्या पुण्याइतके असल्याचे मानले जाते.

विशेषतः ज्यांच्या कुंडलीत मंगळदोष आहे, कर्जमुक्ती हवी आहे किंवा जीवनातील अडचणी दूर करायच्या आहेत, त्यांच्यासाठी अंगारकी चतुर्थी हा अत्यंत फलदायी आणि सुवर्णसंधीचा दिवस मानला जातो. या दिवशी भक्तीभावाने बाप्पाची पूजा केल्यास जीवनातील विघ्ने दूर होतात, अशी श्रद्धा आहे.