Home महाराष्ट्र विदर्भाची प्रती पंढरी घोराडमध्ये संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाची जय्यत तयारी

विदर्भाची प्रती पंढरी घोराडमध्ये संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाची जय्यत तयारी

434

मुख्य संपादक – पंकज तडस ( 9975765632 )

सेलू :–

सेलू तालुक्यातील विदर्भाची प्रती पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरतीरी वसलेल्या घोराड तीर्थक्षेत्रात श्री संत केजाजी महाराज यांच्या ११९ व्या पुण्यतिथी महोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून हा भव्य धार्मिक सोहळा ११ ते २१ जानेवारी या कालावधीत भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे.

श्री विठ्ठल – रुखमाई देवस्थान घोराड ट्रस्ट व संत केजाजी महाराज सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आयोजित होणाऱ्या या महोत्सवासाठी यंदाही विदर्भासह विविध भागांतून ५० हजारांहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाविकांच्या सोयीसुविधांसाठी संपूर्ण घोराड गाव एकवटले असून ग्रामस्थ सेवा कार्यात सक्रिय सहभाग घेत आहेत.

महोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते १७ जानेवारी दरम्यान श्रीरामकथा ज्ञानयज्ञ सप्ताह होणार असून दुपारी १ ते ४ व सायंकाळी ७.३० ते रात्री १० या वेळेत दोन सत्रांत कथा प्रवचन होईल. या कथेचे प्रवक्ते आळंदी येथील सुप्रसिद्ध ह.भ.प. विश्वंभर महाराज माळोदे असणार आहेत.

तसेच ११ ते १८ जानेवारी दरम्यान ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण आयोजित करण्यात आले असून पारायणाचे व्यासपीठ ह.भ.प. प्रमोद महाराज ठाकरे भूषविणार आहेत. पारायण दररोज सकाळी ७ ते १० या वेळेत होणार आहे.

श्री संत केजाजी महाराज यांचा महापरिनिर्वाण दिन १८ जानेवारी असल्याने या दिवशी विष्णू सहस्त्रनाम, श्री संत केजाजी महाराज चरित्र पारायण, समाधी पूजन, ज्ञानेश्वरी पारायण सांगता तसेच रात्री गावात घरोघरी आणि देवस्थान परिसरात भव्य दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. १९ जानेवारी रोजी पालखी दिंडी सोहळा होणार असून २० जानेवारी रोजी काला-दहीहंडी व महाप्रसादाचे वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहेत.

महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून २१ जानेवारी रोजी प्रक्षाळ पूजेने पुण्यतिथी महोत्सवाची सांगता होणार आहे.

महोत्सवानिमित्त संपूर्ण देवस्थान परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघणार असून ग्रामपंचायतीकडून गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आकर्षक रंगरांगोटी करण्यात आली आहे. भाविकांच्या स्वागतासाठी घोराड गाव पूर्णतः सज्ज झाले आहे.