Home Breaking News केळझर हादरले: बेपत्ता ९ वर्षीय मुलाचा तलावात मृतदेह सापडला

केळझर हादरले: बेपत्ता ९ वर्षीय मुलाचा तलावात मृतदेह सापडला

1374

केळझर येथे बेपत्ता मुलाचा मृतदेह तलावात आढळला; गावात शोककळा

पोस्टमार्टेम अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

पोलीस गस्तीदरम्यान मृतदेह आढळून आल्याने खळबळ

सेलू :–

रविवार, दि. १४ डिसेंबर रोजी सायंकाळपासून बेपत्ता असलेला आर्यन किशोर बावणे (वय ९ वर्षे) याचा मृतदेह बुधवारी सायंकाळी गावातील मच्छी बीज केंद्राच्या तलावात आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावात शोककळा पसरली आहे.

सायंकाळी सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक प्रविण भोयर, पोलीस हवालदार श्रावण ठाकरे व पोलीस शिपाई मारुती किन्नाके हे मच्छी बीज केंद्राच्या तलावाकडे गस्त घालत असताना तलावात काहीतरी तरंगताना दिसून आले. जवळ जाऊन पाहणी केली असता तो बेपत्ता असलेल्या आर्यनचा मृतदेह असल्याची खात्री पटली. यानंतर तात्काळ प्राथमिक पंचनामा करण्यात आला व गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मनोज गभने, पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद धनुले, प्रकाश पोहाणे, तसेच प्रशांत वंजारी, श्रावण पवार, नरेंद्र कांबळे, संदीप मेंढे, वैभव जगने, संजय पटले, कय्युम शेख, पोलीस पाटील प्रकाश खंडाळे, आर्थिक गुन्हे शाखेचे देवेंद्र ठाकुर आदी अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

याशिवाय अतिरिक्त पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी (वर्धा) प्रमोद मकेश्वर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.प्रज्वल लटारे यांच्या रुग्णवाहिकेद्वारे सेलू सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठि पाठविण्यात आले.पोस्टमार्टेम अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, ही बातमी गावात पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. लहान वयातच आर्यनचा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.