
सेलू –
तालुक्यातील सुकळी रोड परिसरात वन विभागाने सोमवारी ( ८ डिसेंबर ) सायंकाळी केलेल्या कारवाईत बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या तिन्ही जणांना जेरबंद करण्यात आले. या कारवाईत बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली असून प्रकरणाची साखळी हळूहळू उलगडत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा येथील धुनीवाले चौक परिसरातील आकाश भाई नावाच्या व्यक्तीने आरोपींशी संपर्क साधून वाघाची चामडी उपलब्ध नसल्याने बिबट्याची चामडी व्यवहारात घ्यावी असा सल्ला दिल्यामुळे हा प्रकार चव्हाट्यावर आला. त्यानंतर वन विभागाने रचलेल्या सापळ्यात तिन्ही आरोपी अडकले.
अटक आरोपींची नावे अशी — शालिनी हरिदास पावर (४३, रा. खरांगणा मोरांगणा), सौरभ सुभाष रुंदई (४५, रा. मोहगाव झिल्पी, ता. हिंगणा, जि. नागपूर) आणि अनिस राजू तुमडाम (१९, रा. बोरगाव नांदुरा).
मंगळवार, ९ डिसेंबर रोजी आरोपींना सेलू न्यायालयात हजर करण्यात आले असता, तपासासाठी वन विभागाने कोठडीची मागणी केली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील विशाखा गजभिये यांनी आरोपींकडून आणखी माहिती मिळविणे आवश्यक असल्याचे सांगत कोठडीची विनंती केली. न्यायालयाने युक्तिवाद मान्य करून तिन्ही आरोपींना एक दिवसांची वन कोठडी सुनावली.
वन विभागाकडून आरोपींनी वापरलेली साधने, बिबट्याची शिकार कुठे झाली, पंजे-नखे यांसह इतर पुराव्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू असून या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा थांगपत्ता लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.





