Home घडामोडी सेलू येथे पाणीपुरवठा पाईपलाईन कामामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; कंत्राटदाराच्या मनमानी कारभारावर शेतकऱ्यांचा...

सेलू येथे पाणीपुरवठा पाईपलाईन कामामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; कंत्राटदाराच्या मनमानी कारभारावर शेतकऱ्यांचा संताप

171

सेलू :–

सेलू शहराला बोरधरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी या कामात कंत्राटदाराचा मनमानी कारभार उघड झाल्याचे समोर आले आहे. घोराड लगत हिंगणी रोडवर यंत्राच्या साहाय्याने खोदकाम सुरू असून या कामादरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील काटेरी तारांचे कुंपण तोडण्यात आले आहे. काही ठिकाणी तर शेत जमीनच उध्वस्त झाली असून शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

शेतकऱ्यांचा आरोप आहे की, काम करताना त्यांना कुठेही विश्वासात घेण्यात येत नाही. परवानगी घेतली असली तरी त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान करून काम करण्याची मुभा आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खोदकामामुळे आधीपासून अस्तित्वात असलेल्या नळयोजनेच्या पाईपलाईनलाही धोका निर्माण झाला आहे. याबाबत स्थानिक ग्रामपंचायतीने आधीच लेखी आक्षेप नोंदवला असल्याची माहिती मिळते.

शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला असून—

“आमचे कुंपण तोडले, पिकांचे व झाडांचे नुकसान केले… हे नुकसान भरून काढणार कोण? कंत्राटदार बिनधास्तपणे काम करून शेतकऱ्यालाच भरडत आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही नियोजनातील त्रुटी व अनियमित कारभारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची चर्चा सर्वत्र असून, मुदत संपूनही मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे की—

कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करून झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.