Home महाराष्ट्र वर्ध्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा घोटाळा!

वर्ध्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा घोटाळा!

79

उपविभागीय अभियंता रोहित चंदेल यांचा “वेस्ट मटेरियल विक्री धंदा” उघड

वर्धा :–

सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा-१ चे उपविभागीय अभियंता रोहित चंदेल यांच्यावर शासनाचे वेस्ट मटेरियल काळ्या बाजारात विकल्याचे गंभीर आरोप झाले आहेत.

गडचिरोली येथून नुकतेच वर्ध्यात बदलीवर आलेले चंदेल यांनी पदभार स्वीकारताच गैरव्यवहार सुरू केल्याचे समोर आले आहे. कारला चौक ते कारला बायपास रस्त्याचे काम पेटी कंत्राटदाराकडून सुरू असून, या कामातील उखडलेली खडी, मुरूम व माती हे मटेरियल जनतेस उपलब्ध करून न देता थेट विक्रीसाठी ढिगाऱ्यांमध्ये ठेवण्यात आले. या प्रकरणात तब्बल २५ ते ५० ट्रक मटेरियल विकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आदेशाकडे दुर्लक्ष

पिपरी (मेघे) येथील ग्रामस्थांनी गावातील रस्ते दुरुस्तीसाठी व पत्रकारांनी चिखल हटवण्यासाठी हे मटेरियल मागितले होते. मात्र चंदेल यांनी सपशेल नकार दिला. इतकेच नव्हे तर जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांनी “जनतेसाठी मटेरियल वापरण्यास हरकत नाही” असे आदेश दिल्यानंतरही चंदेल यांनी आदेशाला बगल दिली.

ठेकेदाराशी संगनमताचा आरोप

या संपूर्ण प्रकरणात पिपरी (मेघे) ग्रामपंचायतीच्या ठेकेदाराशी चंदेल यांचे संगनमत असल्याची चर्चा सुरू असून, जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे.

कारवाईची मागणी

आधीच रस्ता काम मुदतीपलीकडे प्रलंबित असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यातच शासनाचे वेस्ट मटेरियल विकून खिसा भरणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात पिपरी (मेघे) परिसरातील नागरिकांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.