Home राजकीय वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीची संघटनात्मक आढावा बैठक जिल्हा प्रभारींच्या उपस्थितीत संपन्न

वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीची संघटनात्मक आढावा बैठक जिल्हा प्रभारींच्या उपस्थितीत संपन्न

84

वर्धा  :

वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीची संघटनात्मक आढावा बैठक जिल्हा मुख्यालयातील इंदिरा सद्भावना भवन, वर्धा येथे पार पडली. काँग्रेस संघटन अधिक सक्षम व्हावे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस जिल्हा प्रभारी मा. आमदार व मंत्री राजेंद्र मुळक, तसेच रणजीत कांबळे (वरिष्ठ उपाध्यक्ष, म.प्र. काँग्रेस कमिटी) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यासोबतच वर्धा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी सुरेश भोयर (देवळी), अतुल कोटेचा (वर्धा),  अनिल गायकवाड (आर्वी), संजय वानखेडे (हिंगणघाट), नगराध्यक्ष शेखर शेंडे, सरचिटणीस संदेश सिंगलकर, सचिव अभ्युदय मेघे व राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांचीही उपस्थिती होती.

बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी केले. सर्व ब्लॉक अध्यक्ष, शहराध्यक्ष व तालुकाध्यक्षांनी कार्यकारणी व संघटनात्मक आढावा सादर करत आगामी निवडणुकांसाठी आम्ही सज्ज आहोत असे प्रतिपादन केले.

बैठकीत संघटन बळकटीसाठी बूथ लेव्हल बांधणी, नवीन बी.एल.ए.ची नियुक्ती, मतदारांपर्यंत थेट पोहोचणे यावर भर देण्यात आला. यावेळी  राजेंद्रजी मुळक यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करून जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी सक्रिय राहण्याचे आवाहन केले. तर  रणजीत कांबळे यांनी निवडणुकीसाठी रणनीती आखण्याबरोबरच बूथ स्तरावर मजबूत नेटवर्क उभारण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीदरम्यान अनेक महिला व पुरुषांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, तर काहींना पद नियुक्तीपत्र देण्यात आले. संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील पदाधिकारी, युवक, महिला व कार्यकर्त्यांचा या बैठकीत मोठा सहभाग होता.