
वर्धा :
रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कुख्यात गुंड अयाज उर्फ ‘बबलू’ रफिक शेख (वय 42, रा. खडसे लेआऊट, गजानन रेसिडेन्सी, वर्धा) याला अखेर पोलिसांनी गजाआड केले. खुनाचा प्रयत्न, खंडणी, शस्त्र बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये वांछित असलेला हा आरोपी वारंवार आपले लोकेशन बदलून पोलिसांना चकवा देत होता. मात्र, रामनगर पोलिसांनी गुप्त माहिती व तांत्रिक शक्कल वापरत त्याचा शोध लावून अटक केली.
अयाज शेख याचा वर्धा शहरातील इतवारा परिसरात मोठा प्रभाव व दहशत होती. तो स्वतःला मोठा गुंड समजून जबरी वसुली, धमक्या व बेकायदेशीर कारवाया करत होता. या अटकेनंतर पोलिसांनी त्याची धिंड काढत “कोणताही गुंड मोठा नसतो, घाबरू नका – पोलीस प्रशासन तुमच्या सोबत आहे” असा ठाम संदेश नागरिकांना दिला.
स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून, “गुंडांच्या विरोधात पोलिसांची कडक भूमिका वाखाणण्याजोगी आहे” अशी प्रतिक्रिया दिली. यामुळे परिसरातील भयाचे वातावरण संपुष्टात येऊन कायद्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.





