
लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती स्थापना
सेलू :–
सेलूत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या हस्ते सन १८९९ मध्ये स्थापना करण्यात आलेल्या येथील ‘बारभाई ‘ गणेश मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १२६ वर्षाची परंपरा आहे. यावर्षी येथे मोठ्या उत्साहात वाजतगाजत गणरायाची स्थापना करण्यात आली.
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या मगरमिठीतून भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी अनेक थोर महापुरुषांनी आपापल्या परीने प्रयत्न केले. त्यावेळी लोकमान्य टिळक यांनी भारतीयांच्या रोमारोमात स्वातंत्र्याचे स्पुलिंग चेतविण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी लोकांची मने एक करून इंग्रजाविरुद्ध लढा देण्यासाठी लोकांना सज्ज केले. १२६ वर्षापूर्वी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्वतः सेलूत आले व त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यासाठी काही समाज बांधवांशी चर्चा केली. त्यावेळी सुरू झालेला हा सार्वजनिक गणेशोत्सव आजही सलगपणे सुरू आहे. धार्मिक, सामाजिक परंपरा जपत सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून या गणेशोत्सवाकडे पाहिले जाते.
धार्मीक, विधिवत कार्यक्रम
बारभाई गणेश मंडळांनी एक धार्मिक व सामाजिक आचारसंहिता स्वतःला घालून घेतली आहे. त्यानुसार कार्यक्रम पार पडतात. त्यानुसार सर्व कार्यक्रम विधिवत साजरे होतात. दररोज पूजा, आरती, प्रसाद, लंगर, भजन पूजन आदी कार्यक्रम व काही सामाजिक कार्यक्रमही पार पडतात.
गणेश मूर्ती देण्यासाठी असते भाविकांची मोठी वेटिंग
बारभाई गणेश मंडळात सर्वच समाजातील लोकांचा सहभाग असतो. त्यामुळे या मंडळाला सर्वधर्मसमभावाची किनार आहे. सुखकर्ता आणि दुःखहर्ता असलेल्या या गणपतीजवळ अनेक जण माथा टेकतात व त्यांच्या इच्छा पूर्ण होऊन दुःख दूर होते, अशी अनेकांची श्रद्धा आहे. त्यामुळे आपल्याकडून ‘श्री’ची मूर्ती विराजमान व्हावी, असे अनेकांना वाटते. दरवर्षी एकाच जणाला संधी मिळते. त्यामुळे श्री मूर्ती देण्यासाठी दहा वर्षापेक्षा जास्त वेटिंगवर राहावे लागते. यावर्षीची मूर्ती नरेंद्र अग्रवाल यांच्याकडून विराजमान होणार आहे.
म्हणून गणेश मंडळाला बारभाई असे नाव..
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक १२६ वर्षांपूर्वी स्वतः सेलूत आले. त्यांनी मारवाडीपुऱ्यात छोटेखानी मीटिंग घेऊन समाजबांधवांशी चर्चा केली. यावेळी सर्व समाजातील मोजून १२ लोकांची उपस्थिती होती. सर्व जाती-धर्माचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी या गणेश मंडळाला बारभाई गणेश मंडळ असे नामकरण केले. तेव्हापासून खंड न पडता सलगपणे हा उत्सव तेवढ्याच आनंदी आणि उत्साही वातावरणात दरवर्षी पार पडतो.
विसर्जनाच्या दिवशी भव्य महाप्रसादाचे आयोजन
श्रीच्या मूर्तीची विधिवत स्थापना होईल. दररोज नित्यनेमाने आरती पूजा विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतील. ६ सप्टेंबरला भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तर ७ सप्टेंबरला सकाळी मूर्तीची विसर्जन मिरवणूक निघेल. त्यानंतर मूर्तीचे विधिवत विसर्जन होईल. मंडळाचे सर्व सदस्य कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात १२६ वर्षांची परंपरा असलेल्या फार कमी गणेशोत्सवापैकी सेलूच्या बारभाई गणेश मंडळाचा गणेशोत्सव आपली परंपरा व सलगता टिकवून आहे. हे या मंडळाची विशेषता आहे.





