Home महाराष्ट्र विदर्भाच्या अष्टविनायकांपैकी एक केळझरचा सिध्दिविनायक प्रसिद्ध

विदर्भाच्या अष्टविनायकांपैकी एक केळझरचा सिध्दिविनायक प्रसिद्ध

231

मंदिरात दहा दिवस असते भाविकांची रिघ

सेलू :–

विदर्भाच्या अष्टविनायकांपैकी एक म्हणून केळझरचा सिध्दिविनायक प्रसिद्ध आहे. येथील मंदिरात दहा दिवस भाविकांची रिंघ असते.

वर्धा जिल्ह्यात केळझर येथे श्री गणपतीचे मंदिर असून विदर्भाच्या अष्टविनायकातील एक असल्याचे विदर्भात सर्वदूर सुपरिचित आहे. केळझर नागपूरवरून ५२ किलोमीटर तर वर्धेवरुन २६ किलोमीटर अंतरावर टेकडीच्या कुशीत बसलेले आहे. मंदिर वर्धा-नागपूर मुख्य मार्गावर अंदाजे एक फर्लांग अंतरावर उत्तरेकडे उंच टेकडीवर बसलेले आहे. मंदिराकडे जाणारा रस्ता गावातून असून रस्तादर्शक फलक मुख्य मार्गावरच लावण्यात आलेला आहे. वशिष्ठ पुराणाप्रमाणे ऐतिहासिक महत्व असून या गावाचे नाव एकचक्रनगर असल्याचा वशिष्ठ पुराण आणि महाभारतात उल्लेख आढळतो. वशिष्ठ पुराणाप्रमाणे श्रीरामचंद्र प्रभूचे गुरु श्री वैशिष्ठ ऋषी यांचे वास्तव्य असल्याची नोंद असून वशिष्ठ ऋषींनी स्वतःच्या भक्ती व पूजेकरिता या गणपतीची स्थापना केल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर त्याच काळात वर्धा नदीच्या निर्मितीचा उल्लेख आहे. पुराणाप्रमाणे या गणपतीचे नाव ‘वरदविनायक’ असून वर्धा नदीचे ‘वरदा’ असे नाव आहे. हा काळ श्रीरामजन्माच्या पूर्वीचा असून रामजन्मानंतर श्री वशिष्ठ रुषींनी येथील वास्तव्य सोडले. या गावात कुंतीपुत्र पांडव एकचक्रनगरात वास्तव्याला असताना बकासूर नावाच्या राक्षसाला मारल्याचा उल्लेख महाभारतामध्ये असून ते ठिकाण वर्धा नागपूर मुख्य मार्गावर गावाच्या आग्नेय बाजूला बकासुर, तोंड्या राक्षसाचे मैदान म्हणून प्रचलित आहे. याच टेकडीवर श्री गणपतीचे मंदिर आहे. टेकडि निसर्गरम्य असून वाकाटकाच्या काळापासून एक भव्य किल्ल्याचे ठिकाण होते. त्या किल्ल्याला पाच बुरुज होते. तीन माती-दगडांनी बांधलेले भव्य परकोट होते. पहिल्या आणि दुसऱ्या परकोटाच्या आत चौकोनी सुंदर व भव्य अशी विहीर असून त्याला ‘गणेशकुंड’ या नावाने ओळखले जाते. असंख्य भाविक त्याचा तीर्थ म्हणूनही वापर करतात. वाकाटकानंतर प्रवर्शन राजाचे हे गांव मुख्यालय असल्याची इतिहासात नोंद आहे, भोसलेराजे, कोल्हापूरवरून नागपूरला स्थलांतरित होण्यापूर्वी त्यांचा केळझरला मुक्काम झाल्याची नोंद आहे.

केळझरस्थित वरदविनायक

श्री गणपतीची मूर्ती चार फूट सहा इंच उंच असून व्यास १४ फूट आहे. १९९३ ला या मंदिरात जीर्णोद्धाराच्या कामास सुरुवात झाली. १९९४ मध्ये महाशिवरात्रीच्या अगोदर खोदकामात शिवलिंग मिळाले. याविषयी शिवलीला अमृताच्या अखेरच्या अध्यायात एकचक्रानगरात ज्योर्तिलिंग असल्याची नोंद आहे. याच गावात जैन पंथाचे आठवे तीर्थंकर चंद्रप्रभू स्वामींची सुरेख मूर्ती मिळाली. ती आठव्या शतकातील असावी , अनन्यसाधारण आहे.

गणेश उत्सवानिमित्त दहा दिवस मंदिरात रोशनाई केल्या जाते. मंदिर रात्री रोशनाईच्या लाईटाने सर्वांचे लक्ष वेधून घेते. टाळ, विणा, भागवत, भजन कीर्तन आदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पहाटे पुजारी राममुरात मिश्रा श्रींची आंघोळ घालून पूजा अर्चा करुन अभिषेक मंगेश शंकर धरमुळ यांच्या हस्ते होणार आहे. अनंत चतुर्दशीला भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिराचे अध्यक्ष माधव ईस्टकर, सचिव सुभाष तेलरांधे, महादेव कापसे, गजानन नरड, रामचंद्र इंगोले, महेंद्र घवघवे, अनिल तेलरांधे, किशोर महाजन, अमोल जोगे यांनी केले आहे.

विदर्भातून मोठ्या संख्येने भाविक येथे येवुन नवस बोलतात. नवस पूर्ण झाला कि भाविक मोठ्या आनंदाने वरदविनायकाजवळ नवस पूर्ण करतात. अष्टविनायकापैकि नवसाला पावणारा वरदविनायक म्हणुन या ठिकाणी भाविकांची श्रध्दा आहे.