Home वर्धा अवैध हातभट्टी दारूविक्रीप्रकरणी एकाची एमपीडीअंतर्गत अमरावती कारागृहात रवानगी

अवैध हातभट्टी दारूविक्रीप्रकरणी एकाची एमपीडीअंतर्गत अमरावती कारागृहात रवानगी

304

सेलू :–

जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारूविक्रीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून सेलू पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर दारूविक्रीप्रकरणी एका सराईत दारूविक्रेत्यावर एमपीडी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संबंधित आरोपीस अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

सेलू तालुक्यातील केळझर परिसरातील शिवखेडा येथे राहणारा इसम फुला पासून निर्मित अवैध हातभट्टी दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या आरोपीविरुद्ध सन २०२३ ते २०२५ या कालावधीत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत एकूण १८ गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र, अशा कारवायांना न जुमानता तो अवैधरित्या दारूविक्री सुरूच ठेवत होता.

या अवैध व्यवसायामुळे परिसरातील सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले असून महिलांसह नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता संबंधित आरोपीविरुद्ध एमपीडी कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करण्यात आला.

हा प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. त्यानंतर २२ जानेवारी २०२६ रोजी स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करण्यात आले. त्यानुसार संबंधित आरोपीस अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

आगामी सण-उत्सव व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध दारूविक्री, गुंड प्रवृत्ती तसेच रेती माफियांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

सन २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण १८ दारूविक्रीविषयक गुन्ह्यांमध्ये गुंड प्रवृत्तीच्या आरोपींवर तसेच रेती माफियांवर एमपीडी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून, सन २०२६ मधील ही पहिलीच एमपीडी कारवाई ठरली आहे. या कारवाईमुळे अवैध दारूविक्रेते व गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व सेलू पोलिस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरित्या केली.