
वर्धा :
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वायगाव (निपाणी) येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जयंती अर्थात ग्रामजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
गुरुदेव उपासक श्री पराते यांच्या शेतातील तुकडोजी महाराज धाम मंदिर परिसरात सर्वप्रथम स्वच्छता अभियान राबवून परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्यानंतर गुरुदेव सेवकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याचे अभ्यंगस्नान घालून विधिवत पूजन केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
यावेळी ग्रामगीतेच्या पहिल्या अध्यायातील ‘देवदर्शन’ या विषयावर चिंतन करण्यात आले. उपस्थितांना राष्ट्रसंतांच्या विचारांचे महत्त्व पटवून देत विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमानंतर उपस्थित गुरुदेवप्रेमी उपासकांना अल्पोपहार देण्यात आला.
याप्रसंगी अ.भा. गुरुदेव सेवा मंडळाचे वर्धा जिल्हा संघटक रमेशराव किनगावकर, गुरुदेव प्रचारक वामनराव मते, कृष्णाजी डबुरकर, नरेंद्रभाऊ पराते, गणेश पराते, योगेश पराते, शालीक लाजुरकर तसेच वायगाव (नि.) येथील गुरुदेव सेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.





