Home Breaking News केळझर टेकडी उत्खनन प्रकरणी चौकशीची मागणी; खासदार अमर काळे यांचे महसूल प्रधान...

केळझर टेकडी उत्खनन प्रकरणी चौकशीची मागणी; खासदार अमर काळे यांचे महसूल प्रधान सचिवांना पत्र

160

महामार्गालगत अवघ्या 70 मीटरवर परवानगी; नियमभंगाचा आरोप, उत्खनन तात्काळ थांबवण्याची मागणी

सेलू :–

बुटीबोरी–तुळजापूर समृद्धी महामार्गालगत केळझर येथील टेकडी उत्खनन प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या संदर्भात खासदार अमर काळे यांनी थेट महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीवर गंभीर आक्षेप नोंदवत त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

खासदार अमर काळे यांनी पत्रात नमूद केले की, वर्धा लोकसभा मतदारसंघातील सेलू तालुका नजीकच्या केळझर परिसरात समृद्धी महामार्गालगत अवघ्या 70 मीटर अंतरावर टेकडी उत्खननास परवानगी देण्यात आली आहे. या उत्खननामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवितासही धोका संभवतो.

तसेच परिसरातील ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. टेकडी उत्खननामुळे धुळीचे प्रमाण वाढून श्वसनाचे आजार बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय परिसरातील जलस्रोतांवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, 2013 च्या गौण खनिज नियमांनुसार राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटरच्या आत उत्खननास मनाई असल्याचा दावा खासदार अमर काळे यांनी पत्रात केला आहे. अशा परिस्थितीत केवळ 70 मीटर अंतरावर उत्खननास परवानगी देण्यात आल्याने नियमांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित परवानगी रद्द करावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत उत्खननाचे काम तत्काळ स्थगित करावे, अशी ठाम मागणी खासदार अमर काळे यांनी महसूल प्रधान सचिवांकडे केली आहे.