Home Breaking News खुनातील फरार आरोपी नागपुरातून जेरबंद

खुनातील फरार आरोपी नागपुरातून जेरबंद

163

सेलू पोलिसांची कारवाई; आणखी एक आरोपीही अटकेत

सेलू :

तालुक्यातील बेलगाव येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस सेलू पोलिसांनी नागपूर येथून अटक केली. तसेच तपासादरम्यान आणखी एका आरोपीचा सहभाग उघड झाल्याने त्यालाही जेरबंद करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल २०२६ रोजी  पुष्पा योगराज राऊत, रा. बेलगाव, ता. सेलू यांनी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांचा मुलगा प्रवीण राऊत याचा आरोपी सूरज ढगे व फारूक करीम खा पठाण यांनी खून करून मृतदेह बोर नदीपात्रात फेकून दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

या तक्रारीवरून सेलू पोलीस ठाण्यात अप.क्र. २८८/२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(३), २३८, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आरोपी सूरज ढगे यास यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र फारूक करीम खा पठाण हा फरार होता.

ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सेलू पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपीचा माग काढला. त्यानुसार २१ एप्रिल रोजी फारूक करीम खा पठाण (वय ३२, रा. बेलगाव, ता. सेलू) यास नागपूर येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

तपासादरम्यान गणेश रमेश ढगे (वय २६, रा. बेलगाव रोड, सेलू) याचा देखील गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही बेलगाव येथून अटक करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रितम निमगडे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रितम निमगडे, पोलीस अमलदार गणेश राऊत, जावेद धामिया, ज्ञानदेव वनवे व सेलू पोलीस पथकाने पार पाडली.