Home Breaking News प्रशासनाच्या सतर्कतेने खैरी येथे बालविवाह रोखला

प्रशासनाच्या सतर्कतेने खैरी येथे बालविवाह रोखला

71

सेलू : 

तालुक्यातील खैरी येथे होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह प्रशासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे थांबविण्यात आला. स्थानिक प्रशासन, चाईल्ड हेल्पलाईन व विविध विभागांच्या संयुक्त कारवाईमुळे ही कार्यवाही यशस्वी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, बाभूळगाव येथील अल्पवयीन मुलीचा विवाह खैरी येथील २४ वर्षीय युवकासोबत ठरविण्यात आला होता. याबाबत माहिती मिळताच महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन, पोलीस विभाग व स्थानिक प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

संबंधित कुटुंबीयांना खरांगणा पोलीस ठाण्यात बोलावून ग्रामपंचायत अधिकारी तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी संदीप खोडे यांनी पालकांकडून बालविवाह थांबविण्याबाबत जबाबनामा लिहून घेतला. तसेच बाभूळगाव ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती दीपा शिंदे यांच्याशी संपर्क साधून तेथील कुटुंबीयांकडूनही प्रतिबंधात्मक जबाबनामा घेण्यात आला.

चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक आशिष मोडक यांनी कुटुंबीयांचे समुपदेशन करून बालविवाहाचे दुष्परिणाम व कायदेशीर परिणाम समजावून सांगितले. बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अंतर्गत बालविवाह हा दंडनीय गुन्हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

प्रशासनाच्या समजावणीमुळे कुटुंबीयांनी विवाह थांबविण्यास सहमती दर्शविली. बालिकेच्या शिक्षण व सुरक्षिततेस प्राधान्य देण्याचे मार्गदर्शन करण्यात आले असून तिला बाल कल्याण समिती, वर्धा येथे हजर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील कार्यवाही बाल कल्याण समितीमार्फत होणार आहे.

या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, अंगणवाडी सेविका मंगला भानसे, पोलीस पाटील मंगेश बावणे, चंदा नाखले, संतोष डोणे, मधुरी थूल, वैभव भांदककर आदी सहभागी झाले होते.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तृप्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महेश कामडी व चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक आशिष मोडक यांच्या समन्वयाने ही कार्यवाही पार पडली.

बालविवाहासंदर्भातील माहिती त्वरित चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.