
जिद्द, मेहनत आणि नियोजनाच्या जोरावर लाखोंचे उत्पन्न
इतर शेतकऱ्यांसाठी ठरले प्रेरणादायी उदाहरण
सेलू : पंकज तडस 9975765632
पारंपरिक शेतीतील वाढता खर्च, हवामानातील अनिश्चितता आणि कमी नफा यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत सेलू तालुक्यातील घोराड येथील प्रयोगशील शेतकरी विवेक ज्ञानेश्वर माहूरे यांनी रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग करून आर्थिक प्रगती साधली आहे. केवळ अडीच एकर क्षेत्रावर त्यांनी रेशीम कोषाचे दर्जेदार उत्पादन घेत लाखोंचे उत्पन्न मिळविले आहे. 
विवेक माहूरे हे पदवीधर असून पूर्वी ते कपाशी, सोयाबीन व तूर ही पारंपरिक पिके घेत होते. मात्र खर्च वजा जाता हातात फारसे काही उरत नव्हते. त्यामुळे पर्यायी शेती व्यवसायाचा शोध घेत असताना त्यांनी इंटरनेट व युट्युबच्या माध्यमातून रेशीम शेतीविषयी माहिती घेतली. विविध शेतकऱ्यांचे अनुभव पाहून त्यांनी २०१७ मध्ये रेशीम शेती सुरू करण्याचा निर्णय घेतला.
मनरेगा योजनेच्या माध्यमातून एक एकर क्षेत्रात तुतीची लागवड करून त्यांनी सुरुवात केली. तुतीची रोपे तयार करणे, किटक संगोपनासाठी शेड उभारणे, आवश्यक साहित्याची व्यवस्था यासाठी रेशीम विभागाकडून मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू केले. अंडीपुंजाचे संगोपन करताना स्वच्छतेवर भर, वेळेवर तुतीचा पाला पुरवठा आणि तापमान नियंत्रण यामुळे कोषाचा दर्जा उत्तम राहिला.
माहूरे यांनी गेल्या वर्षभरात नऊ बॅचेस काढून खर्च वजा जाता सुमारे ७.५ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला. चालू वर्षात जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांत ६५५.७९ किलो रेशीम कोषाचे उत्पादन घेतले. हा कोष त्यांनी कर्नाटक राज्यातील रामनगरम मार्केटमध्ये विक्रीस नेला. सध्याच्या बाजारभावानुसार या तीन महिन्यांतच त्यांना तब्बल ४ लाख ७५ हजार ९६१ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सन २०२२-२३ मध्ये तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांना “रेशीम रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विवेक माहूरे म्हणाले, “रेशीम शेती हा कमी कष्टात शाश्वत उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. तरुण शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता रेशीम शेतीसारख्या जोडधंद्याकडे वळावे.”
घोराडच्या या शेतकऱ्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर रेशीम शेतीतून आर्थिक यश मिळवत इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.





