Home Breaking News घोराडमध्ये डासांचा वाढता प्रादुर्भाव; नागरिक त्रस्त, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात

घोराडमध्ये डासांचा वाढता प्रादुर्भाव; नागरिक त्रस्त, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात

75

सेलू :–

सेलू तालुक्यातील घोराड गावात सध्या डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून नागरिक हैराण झाले आहेत. सायंकाळ होताच गावातील अनेक भागात डासांचा उपद्रव इतका वाढतो की नागरिकांना घराबाहेर बसणेही कठीण झाले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

गावातील नाल्यांची नियमित स्वच्छता न होणे, ठिकठिकाणी साचलेले पाणी, गटारींची दुर्दशा आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष यामुळे डासांची उत्पत्ती वाढत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

ग्रामस्थांनी अनेकदा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. गावात नियमित फॉगिंग, औषध फवारणी, नाल्यांची साफसफाई आणि स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रशासन काय करेल?

घोराड गावातील वाढत्या डासांच्या समस्येकडे ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ न करता त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

नागरिकांचा सवाल :

रोगराई पसरण्याची वाट पाहणार का? की वेळेत उपाययोजना करणार?