
साहसिक जनशक्ती संघटनेचा नागरिकांसाठी स्तुत्य पुढाकार
सेलू :
वाढत्या उन्हाच्या झळा लक्षात घेता सेलू येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरात नागरिकांसाठी पाणपोई सुरू करण्यात आली. ‘साहसिक जनशक्ती संघटने’च्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन गजभिये मॅडम व सहाय्यक अधीक्षक गावंडे मॅडम यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.
उन्हाळ्याच्या दिवसांत न्यायालयीन कामकाजासाठी मोठ्या संख्येने नागरिक न्यायालयात येत असतात. त्यांना स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र कोटंबकार यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.
यावेळी सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नारायणराव काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिपिक दुबे, थाटे व मुंजेवार यांनी विशेष सहकार्य केले.
या प्रसंगी अॅड. रामप्रसाद लिल्हारे, अॅड. राहुल पाटील, अॅड. कपिल मगरे, संतोष डाखोळे गुरुजी, शीतलप्रसाद पांडे, पवन रहांगडाले, अर्जुन पाठक, रोहित तिवारी, गजानन सूर्यवंशी, विठ्ठल कावळे, रामकृष्ण मानकर, अशोक राऊत, सागर राऊत आदींसह न्यायालयातील कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यायालय परिसरात सुरू करण्यात आलेल्या या पाणपोई उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, उन्हाळ्यात नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





