Home महाराष्ट्र हिंगणघाटात बैठकींचा धडाका; शेतरस्ते, घरकुल अन् कामगार योजनांना गती

हिंगणघाटात बैठकींचा धडाका; शेतरस्ते, घरकुल अन् कामगार योजनांना गती

45

हिंगणघाट : आशिष घवघवे 

उपविभागीय कार्यालयात आमदार समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विविध विकास योजनांबाबत महत्त्वपूर्ण बैठका व कार्यशाळा पार पडल्या. यात मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद/रस्ते योजना, सर्वांसाठी घरे-घरकुल योजना (PMAY 2.0) तसेच इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण समितीच्या बैठकीचा समावेश होता.

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद/रस्ते योजनेअंतर्गत विधानसभा क्षेत्रातील सर्व शेतरस्त्यांची अद्ययावत यादी सादर करून तातडीने कामे सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. शेतरस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून ते बारमाही वापरासाठी सक्षम करणे, शेतीमाल वाहतूक सुलभ करणे व शेतकऱ्यांचा खर्च कमी करणे हा योजनेचा उद्देश असल्याचे आमदार कुणावार यांनी सांगितले.

शासनाने या योजनेतील तांत्रिक अडथळे दूर केल्यामुळे कामांना अधिक वेग मिळणार असून राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतरस्ते उभारणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

त्यानंतर सर्वांसाठी घरे-घरकुल योजना (PMAY 2.0) संदर्भातील कार्यशाळेत ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकांना मार्गदर्शन करण्यात आले. पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नयेत, यासाठी अचूक निवड, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा व पारदर्शकतेवर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक कामगारांपर्यंत पोहोचावा, नोंदणी प्रक्रियेला गती मिळावी आणि बोगस नोंदणी रोखावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी तसेच समिती सदस्य उपस्थित होते. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास ग्रामीण व शहरी विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.