Home Breaking News मोकाट कुत्र्यांचा हल्ला : ४ वर्षीय बालक गंभीर जखमी, सेवाग्राम येथे उपचार...

मोकाट कुत्र्यांचा हल्ला : ४ वर्षीय बालक गंभीर जखमी, सेवाग्राम येथे उपचार सुरू

67

सेलू : –

शहरासह ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असतानाच घोराड येथील सोनिया नगर परिसरात एका चार वर्षीय बालकावर पिसाळलेल्या कुत्र्याने भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाले असून सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपांशु महेश गुरुपंच (वय ४, रा. सोनिया नगर, घोराड) हा आपल्या घराजवळ खेळत असताना अचानक एका मोकाट कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली. कुत्र्याने त्याच्या चेहऱ्यावर तसेच शरीराच्या विविध भागांवर चावा घेतल्याने बालक गंभीर जखमी झाला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याचा आक्रोश ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेत कुत्र्याच्या तावडीतून त्याची सुटका केली.

घटनेनंतर जखमी दीपांशुला तातडीने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू असून त्याच्या शरीरावर खोल जखमा असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, घोराड व परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दिवसाढवळ्या नागरिकांवर, विशेषतः लहान मुलांवर हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांचा संताप

“घोराड गावात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणेही कठीण झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. आता एका निष्पाप बालकाला याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.