Home Breaking News गांजा विक्रीसाठी वाहतूक करणारे दोघे जेरबंद

गांजा विक्रीसाठी वाहतूक करणारे दोघे जेरबंद

226

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 4.12 लाखांचा मुद्देमाल जप्त

वर्धा :

जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गांजा विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली. या कारवाईत २ किलो १०१ ग्रॅम गांजा, प्रवासी ऑटो व मोबाईल असा एकूण ४ लाख १२ हजार ५२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १९ एप्रिल रोजी समुद्रपूर परिसरात गस्त घालत असताना मुखबिराकडून माहिती मिळाली. त्यानुसार कानकाटी चौक, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ येथे सापळा रचण्यात आला.

यावेळी एमएच 49 सीएफ 3611 क्रमांकाच्या ऑटोची झडती घेतली असता गांजा आढळून आला. पोलिसांनी शेख अलीम शेख रमजान (62, नागपूर) व सत्तार खान गौस खान (57, नागपूर) यांना ताब्यात घेतले. दोघेही गांजा विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी समुद्रपूर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अक्षय राऊत, दिनेश बोथकर व अभिषेक नाईक यांनी केली.