
सेलू :
वाहितपूर शिवारात रविवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत एका तरुणाने धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत तरुणाचे नाव सुमित अरुण वरघणे (वय ३०, रा. वाहितपूर) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमित हा सेलू (रोड) वाहितपूर शिवार परिसरात रेल्वे मार्गाजवळ आला होता. त्याचवेळी समोरून धावती रेल्वे येताना पाहून त्याने अचानक रेल्वेसमोर झेप घेतली.
या भीषण अपघातात सुमितचा जागीच मृत्यू झाला असून त्याचे शरीराचे अवयवही गंभीररीत्या विद्रूप झाले. घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सेलू पोलीस करीत आहेत. मृत्यूची वार्ता समजताच वाहितपूर परिसरात शोककळा पसरली आहे.





