
वर्धा :–
शहरातील महिला आश्रम परिसरात शनिवारी रात्री घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली असून, काका व चुलत भावाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी अल्पवयीन पुतण्याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत प्रभाकर भलमे व त्यांचा मुलगा नितीन भलमे यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंबातील एका सदस्याचा लग्नसोहळा महिला आश्रम परिसरात सुरू होता. नवरदेव व वऱ्हाडी मंडळी मारोती मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना आरोपी अल्पवयीन मुलाने अचानक आपल्या काका प्रभाकर भलमे व चुलत भाऊ नितीन भलमे यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले.
या अचानक हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. उपस्थित नातेवाईकांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या हातात धारदार शस्त्र असल्याने कोणीही पुढे जाण्याची हिंमत केली नाही. काही क्षणांतच परिसर रक्ताने माखला.
गंभीर जखमी अवस्थेत दोघांनाही तत्काळ सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले; मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.
प्राथमिक तपासात संपत्तीच्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. सुमारे आठ महिन्यांपूर्वी आरोपी व मृतक प्रभाकर भलमे यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर आरोपी सुडाने पेटून उठला होता. घटनेपूर्वी दोन दिवस आधीच आरोपीने धारदार चाकू ऑनलाईन मागविल्याची माहितीही पुढे आली आहे.
दरम्यान, लग्नाच्या आनंदी वातावरणात घडलेल्या या भीषण घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आनंदाचे क्षण क्षणार्धात शोकांतिकेत परिवर्तित झाले असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





