Home Breaking News सेलू तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाला प्रारंभ

सेलू तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाला प्रारंभ

126

मुख्य संपादक – पंकज तडस ( 9975765632 )

७ मार्चपासून विविध मंडळांमध्ये शिबिरांचे आयोजन; नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण होणार

सेलू : 

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन महसुली अडचणी तात्काळ सोडविण्यासाठी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सेलू तालुक्यातही विविध मंडळ मुख्यालयांवर टप्प्याटप्प्याने शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

महसूल विभागाशी संबंधित विविध दाखले, नोंदी, वारसा प्रकरणे, जमिनीचे उतारे, फेरफार, नोंदवहीतील त्रुटी दुरुस्ती आदी प्रश्नांसाठी नागरिकांना कार्यालयीन दिरंगाईचा सामना करावा लागू नये, यासाठी हे विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या समस्या त्यांच्या गावाजवळच सोडविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

हिंगणी – 07 मार्च 2026 – मंडळ अधिकारी कार्यालय, हिंगणी

सिंदी (रेल्वे) – 14 मार्च 2026 – मंडळ अधिकारी कार्यालय, सिंदी (रेल्वे)

झडशी – 10 एप्रिल 2026 – मंडळ अधिकारी कार्यालय, झडशी

केळझर – 17 एप्रिल 2026 – मंडळ अधिकारी कार्यालय, केळझर

सेलू – 15 मे 2026 – मंडळ अधिकारी कार्यालय, सेलू

प्रत्येक शिबिरात संबंधित मंडळ अधिकारी उपस्थित राहून प्रकरणांचे निवारण करतील. आवश्यक त्या विभागीय अधिकाऱ्यांनाही शिबिरात सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात 27 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता तहसीलदार यांच्या दालनात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत शिबिरांची प्रभावी अंमलबजावणी, तक्रारींचे तातडीने निपटारा आणि नागरिकांना अधिकाधिक लाभ कसा मिळेल याबाबत सूचना देण्यात आल्या.

शिबिराचे ठिकाण अथवा दिनांकात बदल झाल्यास त्याबाबत वेळीच कळविण्यात येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या अभियानामुळे नागरिकांना महसुली कामांसाठी तालुक्याच्या मुख्यालयी वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. प्रशासनाने नागरिकांनी शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.