Home Breaking News सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने सरकारी मातीचा काळाबाजार; महसूल विभागाची रहस्यमय शांतता

सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने सरकारी मातीचा काळाबाजार; महसूल विभागाची रहस्यमय शांतता

248

सेलू :–

सेलू–वडगांव–झडशी रस्त्याच्या सिमेंटिकरण कामातून निघालेल्या सरकारी माती व मुरूमाची खुलेआम विक्री सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा काळाबाजार महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून सुरू असूनही संबंधित यंत्रणांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. सत्ताधारी पक्षाशी संबंधित काही गावपुढाऱ्यांच्या आशीर्वादानेच हजारो ब्रास मातीची बेकायदेशीर विल्हेवाट लावली जात असल्याचे आरोप होत आहेत.

रस्त्याच्या खोदकामातून निघालेली माती व मुरूम ही शासनाची मालमत्ता असताना, ती नियमबाह्य पद्धतीने प्रत्येकी सुमारे तीन हजार रुपये प्रति ट्रक दराने विकली जात असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली काही धनदांडग्यांनी ही माती चोरी करून रस्त्यालगतच्या शेतांमध्ये हजारो ब्रास मातीची बेकायदेशीर साठवणूक केल्याचेही निदर्शनास येत आहे.

एकीकडे एखादा शेतकरी स्वतःच्या शेतासाठी एक ब्रास माती किंवा मुरूम नेण्याचा प्रयत्न करताच मंडळ अधिकारी व तलाठी तत्काळ कारवाईचा बडगा उगारतात. ट्रॅक्टर जप्ती, मोठ्या प्रमाणात दंड आणि नोटिसांची कारवाई क्षणाचाही विलंब न लावता होते. मात्र याच महसूल विभागाला हजारो ब्रास मातीची सर्रास चोरी दिसत नाही का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

ही बाब विविध माध्यमांतून प्रशासनाच्या निदर्शनास वारंवार आणून देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. शासनाचा लाखों रुपयांचा महसूल बुडत असताना महसूल विभागाची ही शांतता संशयास्पद मानली जात आहे. ही उदासीनता मुद्दामची तर नाही ना, असा सवालही उपस्थित होत आहे.

सरकारी मातीच्या विक्रीचा हा गोरखधंदा थांबवण्यासाठी संबंधित यंत्रणा कारवाई करतील का, दोषींवर गुन्हे दाखल होतील का, की नेहमीप्रमाणे हे प्रकरण थंडबस्त्यात जाईल याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.