Home स्थानिक बातम्या कोटंबा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज व आदिशक्ती अभियानांतर्गत महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम

कोटंबा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज व आदिशक्ती अभियानांतर्गत महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम

179

सेलू :

सेलू तालुक्यातील कोटंबा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व आदिशक्ती अभियानांतर्गत महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडी सभागृहात उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच रेणुका कोटंबकार होत्या, तर सामुदायिक आरोग्य अधिकारी वैशाली तितरें प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला. माजी सरपंच रेणुका कोटंबकार यांच्या हस्ते महिलांना वाण म्हणून भारतीय संविधानाच्या प्रतींचे वितरण करण्यात आले. महिलांनी संविधानातील हक्क व कर्तव्यांची माहिती करून घेत सामाजिक जाणीव विकसित करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महिलांचे शिक्षण व जागरूकता ही सक्षम समाजनिर्मितीची खरी पायाभरणी असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी सामुदायिक आरोग्य अधिकारी वैशाली तितरें यांनी महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करत नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपायांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी अंगणवाडीतील चिमुकल्यांना लूट वाटप करण्यात आले, त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमात महिलांसाठी उखाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विजेत्या महिलांना रेणुका कोटंबकार यांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. याचबरोबर गावातील एकल व विधवा महिलांचा सन्मान करून त्यांनाही वाण देण्यात आले, ही बाब उपस्थित महिलांमध्ये विशेष कौतुकास्पद ठरली.

हळदी-कुंकू कार्यक्रमामुळे महिलांमध्ये आपुलकी, एकोपा व सामाजिक सलोखा वाढीस लागल्याचे चित्र दिसून आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य सेविका जयश्री महादूले, आशा सेविका वैशाली रघाटांटे, अंगणवाडी सेविका शोभा चीडाम, ज्योत्स्ना तुमडाम, मदतनीस पूनम खाडे, वंदना मस्के तसेच महिला बचत गटाच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

या कार्यक्रमास गावातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.