Home वर्धा दिंडी सोहळ्याने दुमदुमली एकचक्रीनगरी

दिंडी सोहळ्याने दुमदुमली एकचक्रीनगरी

121

१०१ दिंड्यांचा सहभाग, नेत्रदिपक सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी

सेलू : –

असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले वर्धा- नागपूर रोडवरील केळझर येथील सिद्धीविनायक गणेश मंदिरात गणेश जयंती व महालक्ष्मी उत्सावानिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सोहळ्यात परिसरातील १०१ दिंड्या सहभागी झाल्याने भजन व टाळ यांच्या गजरात केळझरची एकचक्री नगरी दुमदुमली होती.

हजारोंच्या संख्येने भाविकांनी दहीहंडीचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. पांडवकालीन ऐतिहासिक मंदिरात सिद्धीविनायक देवस्थानच्या वतीने गणेश जयंती व महालक्ष्मी उत्सवानिमित्त दिंडी सोहळा व काला व महाप्रसादाचे सिध्दिविनायक गणपती मंदिर समितीच्यातवीने आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात दिंड्या सहभागी झाल्या होत्या. सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यास विदर्भातून हजारो भाविक रात्रीपासून मंदिरात दाखल झाले होते. टाळ-मृदंगाचा निनाद, भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन भजनी मंडळी भजन व टाळ मृदंगाच्या गजरात गावातून पालखी काढण्यात आली. दिंडीसोहळ्याच्या स्वागतासाठी रस्त्या-रस्त्यावर स्वागत कमानी उभारुन रंगीत रांगोळी काढून संपूर्ण रस्ते सुशोभित करण्यात आले होते. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी केली होती. त्यानंतर काला व दहीहंडीचा लाभ घेण्यास भाविकांची गर्दी उसळली होती. लगेच महाप्रसादाला सुरुवात झाली. नंतर सर्व भजन मंडळींना नारळपान व मानधान देण्यात आला. या सोहळ्यात गावातील प्रत्येक भक्तांनी सहभागी झाल्याने केळझर नगरी दुमदुमून गेली होती. हा सोहळा भाविकांना दिवाळीचा आनंद ठरतो. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी विजयबाबु मुरारका संपत्नीक यांच्या हस्ते सिध्दीविनायक व महालक्ष्मीचा अभिषेक करण्यात आला. सात दिवसापासून सुरु असलेल्या या सप्ताहाची ह.भ.प पुरुषोत्तम सायंकार महाराज बोरगाव मेघे व त्यांचा संच यांच्या भागवत कथेने व काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची समाप्ती करण्यात आली. यावेळि केळझरचे मंदिर पुजारी राममुरत मिश्रा, हभप नामदेव ईरुटकर व पुजारी मुकुंदराव राळेगणकर यांची उपस्थिती होती. तसेच मंदिराचे अध्यक्ष माधव ईरुटकर, सचिव सुभाष तेलरांधे, सदस्य महादेव‌ कापसे‌, रामचंद्र इंगोले, गजानन नरड,अनिल तेलरांधे, महेद्र घवघवे, किशोर महाजन, अमोल जोगे व नागरिकांच्या मदतीने उत्साहात सांगता करण्यात आली. सकाळी महालक्ष्मीचा अभिषेक विजय मुरारका यांनी पत्नीसह केला. या दिंडी सोहळ्यातील भजनी मंडळिना गजानन महाराज उपग्रुहाचे मालक सुनिल काटोले यांच्या हस्ते सर्व भाविकांना पाणी वितरीत करण्यात आले.

केळझर गावातील सर्व स्पोर्टिंग क्लब व समस्त गावकऱ्यांनी परिश्रम घेतले, तसेच गावकऱ्यासहीत व परिसरातील बाहेरगावरुन आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर कमिटीने भजनी मंडळी व सर्व भाविकांचे आभार मानले.