Home वर्धा कराटे खेळाडूंचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

कराटे खेळाडूंचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

96

महिलांनी आत्मसुरक्षेसाठी कराटे खेळात पारंगत व्हावे : अंबिका हिंगमिरे

वर्धा :–

खेळाडूंच्या यशामागे त्यांचे धैर्य, एकाग्रता, अथक परिश्रम व प्रबळ आत्मविश्वास यांचा संगम असतो. त्यासोबतच प्रशिक्षक व वरिष्ठ खेळाडूंचे मार्गदर्शनही यशात मोलाची भूमिका बजावते. सध्याच्या सामाजिक परिस्थितीत महिलांना आत्मसन्मान व आत्मसुरक्षेसाठी कराटेसारख्या खेळांचे प्रशिक्षण अत्यावश्यक असून पालकांनी मुलींना अशा खेळांकडे प्रोत्साहित करावे, असे प्रतिपादन अंबिका सोशल फाउंडेशन वर्धा जिल्ह्याच्या संस्थापक अध्यक्ष अंबिका हिंगमिरे यांनी केले.

त्या गुरुवार (दि. २२ जानेवारी) रोजी सायंकाळी धर्म कॉम्प्लेक्स, हिंगणघाट रोड, बोरगाव (मेघे) येथे आयोजित कराटे किट, बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. हा कार्यक्रम स्पोर्ट शोतोकान कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडिया अंतर्गत स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक तथा स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे संरक्षक इमरान राही यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाध्यक्ष सतीश इखार, सामाजिक कार्यकर्ते मनोज तरारे उपस्थित होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष व जिल्हा सचिव शिहान मंगेश भोंगाडे, सहसचिव हरीश पाटील, दक्ष नागरिक फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश खंडार, गॅरंटी इंग्लिश स्पीकिंगचे संचालक शाम पटवा, महिला संचालिका हेमलताताई काळबांडे, महाराष्ट्र ब्रँच ॲडव्हायझर सेन्साई चेतन जाधव, आयोजक सेन्साई पूजा गोसटकर, राष्ट्रीय पंच सेन्साई वाणी साहू यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी इमरान राही यांनी जागतिक स्तरावर भारताला क्रीडा क्षेत्रात प्रगतीसाठी अधिक प्रयत्नांची गरज असून कराटे खेळासाठी शिहान मंगेश भोंगाडे जिल्हास्तरावर विशेष कार्य करत असल्याचे गौरवोद्गार काढले.

शासनमान्य आंतरशालेय कराटे क्रीडा स्पर्धांमध्ये तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मानक असलेल्या आरावाझा कंपनीचे कराटे किट मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच नुकत्याच झालेल्या कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चॅम्पियन टीमचे कॅप्टन सेन्साई कार्तिक भगत यांच्यासह शुभम राखडे, सिद्धार्थ गजभिये, पियुष हावलदार, भार्गव खेवले, अनिकेत वाघमारे, जानवी नांदुरकर, रुजान बाघमोरे, देवांशू लाखे आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमास रामनगर, समता नगर सावंगी (मेघे) व बोरगाव (मेघे) शाखेचे विद्यार्थी, पालक तसेच संस्थेचे वरिष्ठ खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.