Home घडामोडी नायलॉन मांजाविरोधात पोलिसांचा दणका

नायलॉन मांजाविरोधात पोलिसांचा दणका

460

साडेचार हजारांचा मांजा जप्त; दुकानदारावर गुन्हा दाखल

सेलू :–

हमदापूर येथील बाजार लाईन परिसरात अवैधरीत्या नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच देहगाव पोलिसांनी साधना जनरल अँड गिफ्ट सेंटरवर धडक कारवाई करत साडेचार हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केला. या प्रकरणी संबंधित दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजामुळे पक्षी, दुचाकीस्वार तसेच नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होत असल्याने शासनाने नायलॉन मांजाच्या उत्पादन, साठवणूक व विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करत काही दुकानदारांकडून सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, देहगाव पोलीस गस्तीवर असताना हमदापूर येथील बाजार लाईन परिसरात नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी साधना जनरल अँड गिफ्ट सेंटरवर छापा टाकून दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या गोदामाची झडती घेतली. या झडतीदरम्यान सुमारे ४,५०० रुपये किमतीचा नायलॉन मांजा आढळून आला.

ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रल्हाद मदन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आनंद भस्मे, हेमंत शेंडे व ब्रह्मानंद मुन यांनी केली. पोलिसांनी सदर मांजा जप्त करून संबंधित दुकानदार नरेश चौधरी (रा. वॉर्ड क्र. २, हमदापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास देहगाव पोलीस करीत आहेत.

दरम्यान, नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांची दखल घेऊन पोलिसांनी नागरिक व दुकानदारांना बंदी असलेल्या मांजाची खरेदी-विक्री टाळण्याचे आवाहन केले आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.