
सेलू :–
नागपूर कडून येणाऱ्या भरधाव कारणे दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकी चालक रोडवर पडून जागीच ठार झाला. राजू देवतारे वय ५० रा. पवनार असे मृतकाचे नाव आहे. ही घटना आज ता. २० नोव्हेंबर गुरुवारी दुपारी २ वाजताच सुमारास वर्धा नागपूर महामार्गावर केळझर जवळ घडली. धडक देणारी कार पळून गेली असता त्याचा पाठलाग करून पकडण्यात आले.
मृतक राजू देवतारे हे आपल्या एम एच ३२ एडब्ल्यू ०८०३ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने नागपूर येथून येत होते. दरम्यान केळझर शिवारात नर्सिंग कॉलेज जवळ नागपूर कडून भरधाव येणाऱ्या एमएच ३२ एएक्स ३३९७ कारणे त्यांना मागून जबर धडक दिली. त्यात ते दुचाकी घेऊन रोडवर पडले. डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. धडक मारताच कार चालक वाहन घेऊन पळाला. तरुणांनी त्याचा पाठलाग करून त्याला दहेगाव रोडवर ताब्यात घेतले. अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांच्या मदतीने सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अपघाताची सेलू पोलिसांनी नोंद घेतली असून अधिक तपास सुरु आहे.





