Home महाराष्ट्र घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करुन देण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करुन देण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

133

वर्धा :– 

राज्य शासनाच्या दि. ८ एप्रिल २०२५ तसेच ३० एप्रिल २०२५ च्या वाळू, रेती निर्गती धोरणाच्या शासन निर्णयान्वये घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास रेती मोफत वाटप करावयाची आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना पालकमंत्री डॅा. पंकज भोयर यांनी केल्या.

जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी तसेच इतर स्थानिक वापरासाठी वाळू उपलब्ध करुन देण्याकरीता व वाळू धोरण योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थी व जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने जनजागृती होण्याकरीता करीता पालकमंत्री डॅा. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

जिल्ह्यात स्थानिक वापरासाठी ६१ वाळूगट राखीव ठेवण्यात आलेले असून त्याद्वारे स्थानिक तसेच घरकुल लाभार्थ्यांना १४ हजार २१४ ब्रास वाळू उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ९४३ लाभार्थ्यांना ४ हजार ४५० ब्रास वाळू उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच उर्वरीत १० हजार ३०२ लाभार्थ्यांना ३५ हजार २३ ब्रास वाळू शासन निर्णय दि. ३० एप्रिल २०२५ प्रमाणे वितरीत करण्याचे निर्देश पालकमंत्री डॅा.भोयर यांनी दिले. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपवन संरक्षक हरविर सिंह, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्रीकांत शेळके व संबंधित अधिकारी उपस्थित होते.