Home Breaking News बंद पडलेल्या एसटी बसेस तातडीने सुरू होणार; आमदार समीर कुणावार यांच्या पाठपुराव्याला...

बंद पडलेल्या एसटी बसेस तातडीने सुरू होणार; आमदार समीर कुणावार यांच्या पाठपुराव्याला यश

52

नागपूर विभागीय आर.एम.चे आदेश; विद्यार्थी व सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा

हिंगणघाट : आशिष घवघवे 

ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना दर्जेदार आणि नियमित एसटी सेवा उपलब्ध व्हावी यासाठी आमदार समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडली. बैठकीत वर्धा विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापक तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

बैठकीदरम्यान वाढती प्रवासी संख्या, बसफेऱ्यांचे नियोजन, विविध मार्गांवरील सेवांची उपलब्धता, प्रवाशांच्या सुविधा तसेच हिंगणघाट आगारातील बंद पडलेल्या बसेसच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. एसटी सेवा ही सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असल्याने प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

आमदार समीर कुणावार यांनी विशेषतः शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच वाढत्या प्रवासी संख्येनुसार बसफेऱ्यांमध्ये वाढ करून नागरिकांची गैरसोय टाळण्याचे निर्देश दिले.

हिंगणघाट आगारात तांत्रिक कारणांमुळे बंद असलेल्या बसेसची तातडीने दुरुस्ती करून त्या पुन्हा सेवेत दाखल करण्याबाबत आमदार कुणावार यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सूचना केल्या. हिंगणघाट आगाराच्या नवीन इमारतीचे कामही प्रगतीपथावर असून भविष्यात प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीच्या शेवटी परिवहन विभागाने अधिक समन्वयाने काम करून नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करावे आणि एसटी सेवेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्राधान्याने कार्य करावे, असे निर्देश आमदार समीर कुणावार यांनी दिले.

अधिकाऱ्यांच्या माहितीतील तफावत; आमदार कुणावारांनी थेट नागपूर विभागीय आर.एम.शी साधला संपर्क

दिनांक १३ जून २०२६ रोजी वर्धा विभागीय नियंत्रक, वर्धा वाहतूक नियंत्रक, हिंगणघाट आगाराचे डेपो मॅनेजर व बसस्थानक प्रमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या माहितीमध्ये मोठी तफावत आढळून आल्याने आमदार समीर कुणावार यांनी नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांच्या उत्तरांबाबत समाधान न झाल्यामुळे त्यांनी थेट नागपूर विभागीय व्यवस्थापक (आर.एम.) यांच्याशी संपर्क साधून तातडीची बैठक घेण्याचे निर्देश दिले होते.

त्या अनुषंगाने रविवार, १४ जून २०२६ रोजी जनसंपर्क कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत नागपूर विभागीय आर.एम. यांनी आमदार कुणावार यांच्या मागणीची दखल घेत हिंगणघाट आगारातील सर्व बंद पडलेल्या बसेस तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे विद्यार्थी, कामगार तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून एसटी सेवेची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.