
सेलू : पंकज तडस
महाबीज महामंडळाचा पन्नासावा (सुवर्ण महोत्सवी) वर्धापन दिन सेलू येथील कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बीज उत्पादक शेतकरी, भागधारक व कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी चंद्रकुमार माहुले होते. यावेळी मंडळ कृषी अधिकारी जाधव, रवींद्र राऊत, भागधारक राम हिवंज, प्रभारी जिल्हा व्यवस्थापक आनंद गावंडे, तसेच शेतकरी निळकंठ बुर्ले, विनोद महाकाळकर, नामदेव बजाईत, संजय धोंगडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात प्रभारी जिल्हा व्यवस्थापक आनंद गावंडे यांनी महाबीजच्या कार्याचा आढावा घेत विविध सेवा व उपक्रमांची माहिती दिली. तर तालुका कृषी अधिकारी चंद्रकुमार माहुले यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी क्षेत्र अधिकारी मयूर अल्लमवार यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील बीज उत्पादक शेतकरी व कर्मचारी यांची लक्षणीय उपस्थिती होती.





