Home स्थानिक बातम्या कान्हापुर येथे पोलीसांचा ‘संवाद उपक्रम’; नागरिकांच्या समस्या जाणून तात्काळ निराकरणाचे आश्वासन

कान्हापुर येथे पोलीसांचा ‘संवाद उपक्रम’; नागरिकांच्या समस्या जाणून तात्काळ निराकरणाचे आश्वासन

168

सेलू :–

ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध समस्यांना थेट व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या ‘संवाद उपक्रम’ अंतर्गत मौजा कान्हापुर येथे गुरुवारी (दि. २३ एप्रिल २०२६) सकाळी १० वाजता सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मा. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर, पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर (पोलीस स्टेशन सेलू) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. यावेळी महसूल, शिक्षण, कृषी, वन, आरोग्य तसेच महावितरण विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ, पोलीस पाटील आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. नागरिकांनी पोलीस विभागासह महसूल, वन, शिक्षण व वीज विभागाशी संबंधित अडचणी मांडल्या. या समस्यांवर सविस्तर चर्चा करत त्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे आश्वासन मा. पोलीस अधीक्षकांनी दिले.

यावेळी नागरिकांना कायद्याची माहिती देण्यात आली तसेच सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. पोलीस विभागाशी संबंधित तक्रारींवर तात्काळ कारवाई केली जाईल, तर इतर विभागांच्या तक्रारींचा पाठपुरावा करून त्या सोडविण्यासाठी सहकार्य केले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

पोलीस व नागरिक यांच्यात परस्पर सहकार्य वाढल्यास गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे शक्य होईल, असे मत मा. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केले.

हा ‘संवाद उपक्रम’ केवळ औपचारिक न राहता नागरिक व पोलीस यांच्यात विश्वास व सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.