Home Breaking News IPL सट्ट्यावर पोलिसांची धडक; १.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

IPL सट्ट्यावर पोलिसांची धडक; १.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

124

वर्धा :

आयपीएल लाईव्ह क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या बुकीवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २५ एप्रिल रोजी वर्धा शहर पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अविनाश मतेलकर हा आपल्या साथीदारासह राहत्या घरी राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यावर सट्टा जुगार चालवत होता. यावरून पोलिसांनी छापा टाकून आरोपींना रंगेहाथ पकडले.

कारवाईदरम्यान ५ हजार रुपये रोख, दोन मोबाईल (किंमत १.३५ लाख रुपये) व इतर साहित्य असा एकूण १.४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी अविनाश संजय मतेलकर (३७, सुदर्शन नगर). संदीप जगजीत नैन (३१, सिंधी मेघे) यांच्याविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.