Home Breaking News अवैध दारू वाहतुकीवर सावंगी मेघे पोलिसांची धडक कारवाई; 1.24 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर सावंगी मेघे पोलिसांची धडक कारवाई; 1.24 लाखांचा मुद्देमाल जप्त

81

वर्धा :

सावंगी (मेघे) पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांनी धडक कारवाई करत एकूण 1 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावंगी (मेघे) पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, एक इसम काळ्या रंगाच्या बजाज चेतक इलेक्ट्रिक दुचाकीवरून विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक करत आहे. त्यानुसार पोलिसांनी मेघे परिसरात सापळा रचून संबंधित वाहन अडवले.

तपासणीदरम्यान वाहन चालकाने आपले नाव प्रणय विशाल सुटे (वय 24, रा. सालोड (हिरापूर), ता. वर्धा) असे सांगितले. त्याच्याकडील वाहन क्रमांक MH 12 UJ 4261 या दुचाकीच्या डिकीतून विविध कंपनीच्या विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. यात रॉयल स्टॅग, ऑल सीझन्स व बी सेवन या ब्रँडच्या एकूण 180 एमएलच्या बाटल्या सापडल्या. प्रत्येक बाटलीची किंमत अंदाजे 400 रुपये असून एकूण दारूची किंमत सुमारे 4,000 रुपये आहे.

याशिवाय, वापरात असलेली बजाज चेतक इलेक्ट्रिक दुचाकी (किंमत सुमारे 1,20,000 रुपये) जप्त करण्यात आली. अशाप्रकारे एकूण 1,24,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

आरोपीकडे दारू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.

  • ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सावंगी (मेघे) पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाचोळे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी अभय चौबळे, शाम सलामे, गौरव नस्ताम आदींनी पार पाडली.