
सेलू :
तालुक्यातील सालई (पेवठ) येथे बुधवारी (ता. २२) सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास अस्वलीने केलेल्या हल्ल्यात एक इसम गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून जंगलालगतच्या गावांतील नागरिकांमध्ये दहशतीचे सावट निर्माण झाले आहे.
जखमी इसमाचे नाव किसना लक्ष्मण तिळमगाम (वय ५०, रा. सालई पेवठ) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते सकाळी नेहमीप्रमाणे गावाबाहेर शौचास गेले असता दबा धरून बसलेल्या अस्वलीने अचानक झडप घालत त्यांच्यावर हल्ला चढविला.
या हल्ल्यात तिळमगाम गंभीर जखमी झाले. त्यांनी आरडाओरड केल्याने जवळील नागरिक तत्काळ घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने अस्वलीला पळवून लावत जखमीची सुटका केली.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमीस प्रथम सेलू ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना वर्धा येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, सालई (पेवठ) हे गाव जंगलालगत असल्याने येथे वन्य प्राण्यांचा वारंवार वावर असतो. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात तसेच गावाचे पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.





