
ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच पुण्यतिथी उत्सवाला झळाळी
तीन ट्रस्टी व तीन कर्मचाऱ्यांवरच देवस्थानचा गाडा
ट्रस्ट नाममात्र; कारभार दुसऱ्याच्याच हाती?
सेलू :
विदर्भाची प्रतीपंढरी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र घोराड येथील विठ्ठल–रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचा कारभार सध्या पूर्णतः नियोजनशून्य आणि रामभरोसे सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. ट्रस्टची समिती अल्पमतात असून प्रत्यक्षात देवस्थानचा गाडा केवळ तीन ट्रस्टी आणि तीन कर्मचाऱ्यांच्या भरवशावर हाकला जात आहे. यामुळे ट्रस्ट अस्तित्वात असला तरी कारभार मात्र दुसऱ्याच व्यक्तींच्या हातात असल्याची भावना नागरिकांमध्ये बळावत आहे.
संत केजाजी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने कार्यक्रम पार पडतो. मात्र यंदाही हा उत्सव ट्रस्टच्या सक्षम नियोजनामुळे नव्हे, तर ग्रामस्थांच्या श्रद्धा व सहकार्यामुळेच यशस्वी ठरल्याचे वास्तव नाकारता येणार नाही. एवढ्या मोठ्या आणि पुरातन संस्थानासाठी कार्यक्षम व पूर्ण सदस्यसंख्या असलेली समिती अत्यावश्यक असताना सध्या ही व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे.
या संस्थानकडे सुमारे ३६५ एकर शेतजमीन, चितार ओळ, नागपूर येथील मठ तसेच इतर मौल्यवान मालमत्ता आहे. याशिवाय देणग्या, लग्नसमारंभ व विविध धार्मिक कार्यक्रमांतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. असे असतानाही सात सदस्यांची समिती असलेल्या या ट्रस्टमध्ये सध्या केवळ तीनच सदस्य कार्यरत आहेत. त्यांच्यातही अंतर्गत वाद सुरू असल्याने निर्णयप्रक्रिया ठप्प झाली आहे. दोन सदस्य कारभार पाहत असले तरी तो कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का, असा गंभीर सवाल उपस्थित केला जात आहे.
नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या कारभाराला नेमका कोणाचा वरदहस्त आहे, हे अद्याप कोडेच आहे. एवढ्या मोठ्या पुरातन संस्थानातील हा सावळागोंधळ कायद्याच्या चौकटीत बसणारा नसतानाही धर्मदाय आयुक्त व शासनाकडून याकडे होत असलेले दुर्लक्ष नागरिकांच्या रोषास कारणीभूत ठरत आहे.
या प्रकरणी गावातील काही नागरिकांनी धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. यापूर्वीही समितीचा घोळ निर्माण झाल्यानंतर येथे ‘अॅडहॉक’ समिती नेमण्यात आली होती. त्या समितीतील चार सदस्यांचे निधन झाले असून सध्या केवळ तीन सदस्य शिल्लक आहेत. विशेष म्हणजे संस्थानाची घटना काय आहे, याचीही माहिती सध्याच्या कार्यरत सदस्यांना नसल्याचे बोलले जात आहे.
इतर मोठ्या देवस्थानांच्या बाबतीत शासनाने थेट हस्तक्षेप करून ताबा घेतलेला असताना, घोराड संस्थानाच्या बाबतीत मात्र अशी लापरवाही का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. हा प्रकार जनतेच्या श्रद्धा आणि भावनांशी खेळ असल्याचा आरोपही होत आहे.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकारी व शासनाने तातडीने लक्ष घालून या पुरातन संस्थानाचा ताबा घ्यावा, कारभार सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि जनतेतून सक्षम व कायदेशीर समिती स्थापन करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.





