Home महाराष्ट्र अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा आरोपी नागपूरहून गजाआड; सेलू पोलिसांची धडाकेबाज कारवाई

अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा आरोपी नागपूरहून गजाआड; सेलू पोलिसांची धडाकेबाज कारवाई

393

सेलू :–

सेलू शहरातील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी नागपूर येथे सापळा रचून ताब्यात घेतले. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, वर्धा यांच्या पथकाने ही कारवाई अत्यंत शिताफीने केली.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार १७ वर्षीय मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार सेलू पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली. यावरून अप. क्र. 764/2025 नुसार कलम 137(2), 143(4) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. मुलगी आणि आरोपीचा मागमूस न लागल्याने तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला.

मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी दिलेल्या विशेष सूचनांनुसार पथक तयार करून तांत्रिक तपास सुरू करण्यात आला. खात्रीशीर माहितीदाराच्या मदतीने मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रोशन प्रकाशराव डोंगरे (वय 24, रा. सेलू) हा नागपूर येथील साईनगर, बिडगाव परिसरात आढळून आला. पथकाने तत्काळ सापळा रचून आरोपीस जेरबंद केले.

दरम्यान, अल्पवयीन मुलगी देखील आरोपीसोबत राहत असल्याचे समोर आले. पथकाने तिलाही सुरक्षित ताब्यात घेतले. आरोपीस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अटक करण्यात आली असून पुढील तपास सेलू पोलीस स्टेशनमार्फत सुरु आहे. मुलीची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून तिला पोलीस स्टेशन सेलू कडे सुपूर्द करण्यात आले.