Home Breaking News ग्रामीण भागातील खेळाडूची मोठी झेप; सेलू तालुक्यात आनंदाचे वातावरण

ग्रामीण भागातील खेळाडूची मोठी झेप; सेलू तालुक्यात आनंदाचे वातावरण

53

सूर्यधरम स्पोर्टिंग क्लबच्या यशस्वी राठोडची ‘खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रा’साठी निवड

सेलू :

सेलू शहरासाठी अभिमानाची बाब ठरणारी उल्लेखनीय कामगिरी सूर्यधरम स्पोर्टिंग क्लबच्या खेळाडू कु. यशस्वी नामदेव राठोड हिने केली आहे. तिची पुणे येथील खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रात (Khelo India State Centre of Excellence) प्रवेशासाठी निवड झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे-बालेवाडी (पुणे) यांच्या वतीने ११ ते १९ मे २०२६ दरम्यान राज्यस्तरीय कौशल्य चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत यशस्वीने उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या गुणवत्तेची छाप पाडली. तिच्या कौशल्याची दखल घेत निवड समितीने तिला खेलो इंडिया केंद्रासाठी पात्र ठरविले आहे.

यासंदर्भात क्रीडा प्रबोधिनी, पुणे येथून अधिकृत पत्र प्राप्त झाले असून प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गेल्या चार वर्षांपासून यशस्वी सातत्याने व कठोर परिश्रमाने सराव करत आहे. सूर्यधरम स्पोर्टिंग क्लबमध्ये मुख्य प्रशिक्षक सागर राऊत व समीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली तिने आपली क्रीडा कारकीर्द घडविली. उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि राष्ट्रीय स्तरावरील संधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमात निवड होणे हे तिच्या उज्ज्वल क्रीडा भवितव्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

यशस्वीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, प्रशिक्षक सागर राऊत, समीर सय्यद तसेच सूर्यधरम स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष रामप्रसाद लिल्हारे, प्रवीण इंगळे, प्रमोद नागोसे, प्रतीक पाटील, कैलास बिसेन, मयूर बोकडे, सुनील गौतम, प्रयास कोल्हे, आकाश नौकरकर, प्रीतम भांडेकर, सागर कटरे, राकेश रहाटे, शुभम धोटे, केतन डुकरे, रुपेश कुंबरे, गणेश देशमुख, संकेत पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक मेश्राम, तालुका क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे, व्यवस्थापक रवी काकडे तसेच वर्धा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव रमेश बुटे यांना दिले आहे.

ग्रामीण भागातील एका सामान्य विद्यार्थिनीने जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर मिळविलेल्या या यशामुळे संपूर्ण सेलू तालुक्यासह वर्धा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यशस्वीच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यात ती राज्य व देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.